×

Rupin Pass Trek

By Aseem Avhad in Travelogues
Updated 22:45 IST Jan 26, 2019

Views » 853 | 5 min read

आपल्या आरामदायी पर्यटनाची वाट सोडून जरा आडवाट धरायची ठरवली तर निसर्गाची आपण न पाहिलेली, अद्भुत, विलोभनीय अशी रूपं आपल्या समोर यायला लागतात.त्यातलच एक म्हणजे हिमालयातील ट्रेकिंग.हिमालयात ट्रेकिंग करायचं म्हंटल्यावर रुपीन पासचा ट्रेक एकदा तरी करायलाच हवा.

रुपीन पास हा उत्तराखंड मधील एक अ श्रेणीचा ट्रेक.अ श्रेणी म्हणजे अतिशय अवघड.इथले रस्ते उत्तम असतील अशी समजूत मनाला घालून आलात तर तुमची निराशा होईल.इथले बहुतांश रस्ते अजूनही कच्चे आहेत.जसजशी आपण उंची गाठायला लागतो तसतसे आपल्यासमोर जो काही निसर्गाचा चमत्कार दिसायला लागतो तो खरच अवर्णनीय असतो.

देहराडून पासून धौला या छोट्याशा गावापर्यंतचा प्रवास चकित करणाराच आहे.आपल्याला सोबत करणारी खळखळती यमुना नदी. नंतर लागणारी टोन्स नदी. हिमालयीन पद्धतीचे पूल.त्यावरच्या पताका.तिथले चिंचोळे रस्ते आणि त्यावरून गाडीचालवण्याचचालकाच कौशल्य.ह्यागोष्टीनी आपल्याला चकित नाही केले तर नवलच.धौलासाठीचा शेवटचा प्रवास हाडे खिळखिळी करून टाकणारा आहे.धौला ह्या गावात आम्ही पोहोचतो कुठे की पावसाने आमचे जोरदार स्वागत केले.आमच्या स्वागतासाठीचा पावसाचा धुमाकूळ थांबल्यावर जरा गावात चक्कर मारायला बाहेर पडलो.धौला एकदम छोट गावं.इतकं छोटं की त्या गावात मोजून १५ ते २० घरं होती.त्यातले काही तर फक्त ट्रेकर्ससाठी होमस्टे.होमस्टेच्या शेजारीच गर्जना करत वाहणारी रुपीन नदी होती.असं हे छोटस गावं डोळ्यात भरून घेत होमस्टेवर परतलो.

दुस-या दिवशी सकाळी सेवा नावाच्या कॅम्पसाठी कूच केले.सकाळी वातावरण एकदम साफ होते.आकाशात एक ढग नव्हता.मजल दरमजल करत जात होतो.समोरची हिमशिखरं आम्हाला बोलवत होती.विरंगुळा म्हणून सोबत रुपीन वाहत होतीच! हिरव्या हिरव्या गवताने नटलेले २ छोटे डोंगर चढून उतरून कॅम्पसाईट जवळ पोहोचायला लागलो.अचानक वातावरण भरून आले आणि पावसाने हजेरी लावली.तंबू लावायच्या आधीच पाऊस आल्याने तंबू लावताना त्यात पाणी साचून त्यातच डबक झालं होतं.संध्याकाळी पाऊस उघडला त्यामुळे जरा नदीकिनारी जाऊन बसलो.थंड वातावरणात पावसाने थंडीची अजून भर घातली होती.त्यावर उपाय म्हणून कॅम्प फायर झाली आणि तिच्याभोवतीच सगळ्यांनी गाण्याची मैफिल बसवली.पुढच्या दिवशी जीस्कून नावाच्या छोट्या गावी निघालो.आदल्या दिवशीच्या पावसाने सगळीकडे चिकचिक करून ठेवली होती.जीस्कून हे ब-यापैकी मोठं गावं आहे.तिथे जाण्यासाठी थोडे कच्चे थोडे पक्के रस्ते आहेत.आम्हीवरचालत होतो आणि खाली दरीत रुपीन वाहत होती.आजूबाजूच्या झाडांच्या सावलीतूनचालतचालत उन्हाचा तडाखा बसू न देता आम्ही उत्तराखंड ची सीमा पार करून हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश केला.होमस्टे दिसायला लागला होता.चांगला ३ मजली होता तो.त्याच्या सर्वात शेवटच्या मजल्यावर मी गेलो.हिमशिखरांचे मनोहारी दर्शन घडले.आणि थोडं उजवीकडे बघितल्यावर झाका द हँगिंग विलेज दिसले.हे गाव म्हणजे खरच एखाद्या लोंबकळत असलेल्या झोळी सारखं दिसतं.डोंगरांच्या पाय-यांवर घरं बांधून हे गाव तयार झालं आहे.थोड्या वेळ तिथे बसून तिथल्याच एका स्थानिक दुकानात गेलो.आमच्यातल्या एका महिलेला हिमाचली स्वेटर घ्यायचे होते.तिथली शेवटची साईझसुध्दा तिला बसत नव्हती.तो दुकानदार त्या महिलेला म्हणाला, “ हमारे याहांकी ओरते इतनी मोटी नाही होती.इसलिये इस साईझ का स्वेटर आपको यहा नाही मिलेगा.” तो जे बोलला ते सत्य होते तिथल्या बायकांना रोज करावी लागणारी चढउतार यामुळे त्या एकदम सडपातळ असतात.

पुढच्या दिवशी आम्ही बुरांस कांडी या कॅम्पसाईट कडे निघालो.मध्ये झाका लागले.या झुलत्या गावाला झुले (नमस्कार) करत आम्ही पुढे निघालो.रस्त्यात एक घर लागले.या घरातून संपूर्ण दरीचा एक उत्कृष्ट नजरा मिळायचा.सगळ्यांना तिथे जाऊन सेल्फी काढण्याची घाई झाली होती.२ ते ३ डोंगर पार करत आम्ही रुपीन नदी पाशी पोहोचलो.बुरबु-या पावसाने आमचे स्वागत केलेच! तिथून पुढे ती पूर्ण वेळ आमच्यासोबत असणार होती.बुरांस कांडी याचा अर्थ म्हणजे स्थानिक भाषेत रोडोरेडरॉन ची फुलं.ही फुलं फक्त १०००० फुटांच्यावरतीच आढळतात.आणि ह्या कॅम्पसाईटवर फक्त फक्त आणि फक्त रोडोरेडरॉन होते.आम्ही जिथे तंबू ठोकले तिथून खालीच रुपीन होती.थोडं नदीकिनाऱ्यावर जाऊन आलो.तिथून हिमालयातल्या शिखरांच विहंगम दृश्य दिसत होत.असा निसर्ग पाहून मी वेडाच झालो होतो.पण तो तर फक्त ट्रेलर होता सिनेमा तर पुढे बघायचा होता.

सकाळी लवकरच निघालो.धनद्रास थाच या कॅम्पवर पोहोचायचे होते.पहिल्यांदा त्यादिवशी ट्रेकचा हिम लागला.त्या दिवशी ३ हिमनद्या चढून आम्ही ट्रेक करत होतो.समोरची हिमशिखर जवळ बोलवत होती.हिमशिखरांच्या थोडं खाली एक धबधबा होता.त्याचे नावं अप्पर वॉटरफॉल.तोही आम्हाला खुणावत होता.कॅम्पसाईटवर पोहोचतो कुठे कि पावसाने हजेरी लावली.संधाकाळपर्यंत पाऊसचालूच होता.तंबूत पाणी शिरत होतं.अशावेळी मी माझी बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली.सगळ्यांचे मनोरंजन झाले.हिमनद्यांच सोडलं तर बाकीचा दिवस कंटाळवाणा गेला.

पुढच्या दिवशी आम्ही अप्पर वॉटरफॉलसाठी कूच केलं.तिथे पोहोचेपर्यंतच सगळ्यांची दमछाक झालेली.वाटेत ४ते ५ हिमनद्यांचे अडथळे पार करत  हळूहळू चढाईचालू होती.खूप अवघड असा चढ होता.पण हिमशीखारांकडे पाहून अंगात उर्जा संचारत होती.सपाट पठारावर पोहोचल्यावरचा आनद व्यक्त करण्याचा वेळच कुणाला मिळाला नाही.सगळीकडे पसरलेली गवताची कुरणं पाहूनच सगळे खुश होते.अजूनवर जाऊन आम्ही अप्पर वॉटरफॉलच्यावर पोहोचलो.आणि आमचे तंबू टाकले.पण ते होते बर्फावर.तंबुच दार उघडल्यावर समोरच एक छोटी हिमनदी होती.आणि हिमशिखर आपल्यासाठी उभी आहेत असे भासायचे.आमच्या स्वागतासाठी पाऊस नव्हता तर होता हिमवर्षाव! थोडं वातावरण मोकळे झाल्यावर आम्ही रुपिनच्या उगमापाशी गेलो.आणि तिथले मनमोहक दृश्य पाहून मी तिथेच कितीवेळ बसून राहिलो.रुपीनचा उगम होऊन पुढे तिचा धबधबा होत होता.आणि पुढे नदी.पण तिथून मला आमची आधीची कॅम्पसाईट दिसत होती.इच्छा नसताना तिथून उठून तंबूत परतलो.

आणि एकदाचा तो दिवस उजाडला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो.समिटचा दिवस! पहिलाच चेंडू बाउन्सर आला.म्हणजे एकदमच अवघड चढ लागला.बर्फ नसतानाही कित्येक जणांनी लोटांगण घातले.वर पोहोचल्यावर सूर्यदर्शन झाले.सगळी कडे हिमच हिम.कुठेही पहा आपण हिमानेच वेढलेलो.हेही एक वाळवंट होतं फक्त हिमाचं वाळवंट! सूर्य तापायला लागलेला.त्यामुळे हिम हळूहळू वितळायला सुरुवात झालेली.अशातच सगळे पडत पडत चढत होते.थोडी जमीन दिसली कि लगेच सगळे विश्रांतीसाठी बसत होते.एका बाजूला दरी तर एका बाजुला डोंगर.समोर दिसत होता रुपिन पास.आम्ही भुसभूशीत बर्फावरून चालत होतो.सगळ्यांचे पाय घसरत होते.खाली दरी होती त्यामुळे,‘घसरलो तर......’ हा विचार मनात आल्यावर अंगावर काटे उभे राहत होते.हळू हळू मजल दरमजल करत चालत होतो.आणि एकदाचे रुपिन पास च्या पायथ्याशी पोहोचलो.पुढची चढाई जवळपास काटकोनात.कोणालाच चढता येईना.शेवटी शेर्पानी दोर लावले.आणि मग भुसभुशीत हिमावरून ती जीवघेणी चढाई पूर्ण करूनवर आलो.आनंद गगनात मावेनासा झाला.सगळे ओरडत होते.तेवढ्यात पोटाने पण ओरडून ‘मी आहे’ याची जाणीव करून दिली.तिथे मी बासरीवर राष्ट्रगीताची धून वाजवली.आणि खाली उतरण्यास सुरुवात केली.खाली उतरायला लागल्यावर उतरण्यापेक्षा चढणं जास्त सोपं असत याचा प्रत्यय आला.उतरताना जास्त घसरायला होत होते.काही ठिकाणी घसरगुंडी शिवाय पर्यायाच नव्हता.एक घसरगुंडी सगळ्यात अवघड होती.म्हणजे भारूर लांबही होती आणि धडकी भरवणारी होती.मी खाली घसरत असताना एक तीव्र वळण आले.मला क्षण भर वाटले आता आपण दरीत.पण मी आपोआप त्या वळणावर वळलो गेलो.हिमालयाला माझी काळजी होती तर! ७ ८ तास चालून चालून तेही बर्फात कंटाळा आलेला.बर्फाचा पण आणि चालण्याचा पण.पण नाईलाज होता.हे कमी कि काय म्हणून पावसाने आपली नियमितता सिद्ध केली.उतरताना बसत बसत येत आम्ही कॅम्पसाईटवर पोहोचलो.सगळे एकदाचे देवाचे आभार मनात तंबूत पहुडले.आणि तसेच झोपले.

हा दिवस ट्रेक चा शेवटचा दिवस होता.या दिवशी फक्त उतरणं होतं.आम्ही विरुद्ध दिशेला उतरत होतो.म्हणून रुपिनने आमची साथ सोडलेली.पण इथे मात्र साथीला पाइन ची झाडं होती.पाईन चे कोण गोळा करत करत, वाटेत भेटलेल्यांशी गप्पा मारत आम्ही ट्रेक पूर्ण केला. मध्ये याक नी आम्हाला दर्शन दिले.सगळ्यांनी एकाच जल्लोष केला.आम्ही सांगला नावाच्या गावी पोहोचलो. तिथे मात्र आमचे स्वागत पावसाने केले नाही पण आमचे स्वागत बास्पा नदीने केले. आणि तिथूनच आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.हिमालयाचे जेवढे रुप डोळ्यात भरून घेता येईल तेवढे भरून घेत.इथल्या प्रतिकूल परीस्थितीत राहणाऱ्या माणसांना सलाम करतच आपण घरी निघतो.

हिमालयाच्या अंगाखांद्यावर खेळून आल्यावर आपल्याला आपण किती फिट आहोत याची जाणीव होते.हिमालयात ट्रेक करणार्यांनी निसर्गाच्या विविध रुपांसाठी हा ट्रेक जरूर करावा असा हा ट्रेक आहे.

असीम आव्हाड

avhadaseem30@gmail.com

1 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.

Sign up for our Newsletter

Follow Us