गेम, सेट, मिसमॅच
आॅफिसमध्ये आल्या - आल्या ' सेक्सी विदाउट व्हिआग्रा ' अर्थात ' सेविव्ही ' ने ' पार्टनर्स फाॅर यु ' ची साईट उघडली. जास्त वेळ न दवडता ' फक्त तुझीच ' अर्थात ' फतू ' च होम पेज उघडल आणि झटदिशी एक मेसेज टाईप करून पोस्ट केला. त्याला माहित होत की मासा गळाला लागलेला आहे ! त्यामुळे उत्तराची वाट खन बघता त्याने रुटीन कामाला सुरुवात केली. उत्तर तो वाचणार होताच पण थोड्या वेळाने.
' और, सब कुछ ठीक ना ? ' त्याच्या बाजूने जाता - जाता सिस्टीम मेंटेनन्सच्या अतीकने विचारल.
' हुं ...' त्याच्याकडे न बघता तो म्हणाला.
' काय मॅनेजमेंट आहे ! फेसबुक, हाय फाइव्ह… फ्रेन्डशिपच्या सगळ्या साईट्स ब्लॉक केल्यायत, भुक्कड साले '. म्हणे लोक काम कमी करतात आणि चॅटिंग जास्त. परफाॅरमन्स वर परिणाम होतो. मुर्खानो ! चॅटिंगच करायचं झालं तर जीमेल किंवा याहूवर नाही का करता येत ? का आता तेही ब्लाॅक करणार ? ' पार्टनर्स फार यु ' ही साईट नजरेतून सुटली हे नशीबच म्हणायचं, नाहीतर ती ही ब्लाॅक केली असती साल्यांनी. ' मॅनेजमेंट विषयीचा राग त्याच्या मनात ओसंडून वहात होता...
इतक्या दिवसाचा उपास सुटणार म्हणून ' सेविव्ही ' आज अगदी खुशीत होता. नाही म्हणायला काही ' वूड बी ' पार्टनर्स त्याला भेटले होते. पण त्यांच्याशी ह्याच काही जमेना. कुणी म्हणे असं, तर कुणी तसं. विचारच जुळले नाहीत तर कसं होणार ? त्यामुळे पुढे काही डेव्हलपमेंट झाली नाही. एकदा तर त्याच्या मनात विचार आला की ही साईट सोडावी. ' जर आपल्या पसंतीच कुणीच इथे नसेल, तर वाट तरी किती बघायची ? सगळे साले स्वार्थी ! ह्यांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे व्हायला हव सगळ. एकानेही मला काय आणि कसं हवय त्याबद्दल पर्वा केली नाही. मरा असेच एकटे ' . तो स्वतः शीच विचार करत होता.
-------------------------
दिवसाच्या असाइनमेंट्स भराभर उरकून त्याने बोरीवली फास्ट पकडली आणि दादरला उतरून टॅक्सी घेतली. बरोबर सव्वा सहाला तो सेंचुरी बाजारपाशी उतरला. झपझप पावल टाकत रस्ता क्राॅस करून एका बिल्डिंगपाशी येऊन त्याने चौथ्या मजल्याची कळ दाबली. मनाशी सगळी उजळणी करत तो क्षणभर थांबला. नेहेमीप्रमाणे त्याने ही सुरक्षित जागा निवडली होती कारण त्याला एकदम पुढे यायचं रिस्क घ्यायचं नव्हत. आणि ते साहजिकच होत. ह्या बाबतीत निदान त्याचा अनुभव खूप आशादायक नव्हता. शिवाय काही झालं तरी इभ्रतीचा प्रश्न होता. उगीच लोकांमध्ये शोभा कशाला ? हे सावज हवं - हवंस वाटणार होत हे मात्र नक्की. त्यामुळे काही केल्या ह्या झोनला हातातून निसटून द्यायचं नाही, अगदी स्वतः च्या आवडींना मुरड घालावी लागली तरी, असा विचार त्याने केला. भेटण्याची जागा निवडताना तो नेहेमीच सतर्क असे. ' ह्या एरियात मला रेंट वर जागा हवी आहे ' असं जेव्हा त्याने ब्रोकरला सांगितल, तेव्हा तो अक्षरश पाघळला. ' कुत्रा कुठला, मी चार शब्द काय बोललो तर लागला लगेच शेपूट हलवायला '. किळसच आली त्याला. वाटलं, त्याचे डोळे फोडून हातात द्यावेत '. कधी येता बघायला ? ' असं ब्रोकरने विचारताच आपला सगळा चार्म वापरून त्याने किल्ली तर मिळवलीच, शिवाय ' तुम्ही कशाला येता, मीच घेईन बघून ' असं म्हणत त्याला कटवला सुद्धा.
चौथ्या मजल्यावर असलेला तो फ्लॅट म्हणजे एकांतात भेटण्यासाठी आयडिअल जागा होती. एका मजल्यावर दोनच फ्लॅट असलेल्या त्या बिल्डींगमधले बहुतेक सगळे लोक उन्हाळी सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेले होते. शिवाय ह्या फ्लॅटच्या बाल्कनीतून सगळा परिसर स्वछ दिसत होता. कुठल्या रंगाचे कपडे घालावे, ते ही त्याने ' फतू ' ला सांगितल होत. त्यामुळे सावज टप्प्यात आल की त्याला दिसणारच होत. ' बस, आता थोडाच वेळ ... नंतर मी आणि ' फक्त तुझीच ' ... दोघच असू इथे ... ' सेविव्ही ' च्या मनात विचार आला.
-----------------------
शाळेत असताना एक दिवस अनन्याच्या अंगाला घाम सुटला आणि छातीत दुखू लागल. हळूच हात दाबत तिने छाती चोळून पाहिली पण छे ! काही केल्या दुखायचं थांबेना. त्या वेळी इतिहासाच्या बाई झाशीच्या राणीबद्दल सांगत होत्या. कस इतक्या लहान वयात ती युध्द खेळली वगैरे. पण आपला बाप शोभेल अशा माणसाशी तिच लग्न झालं होत, हे मात्र धड्यात कुठेच लिहील नव्हत तर ते बाईना तरी कुठून कळणार आणि त्या कधी सांगणार ! छातीत इतक दुखत असताना सुद्धा तिला हसू आल. आता बाईना विचारून बाथरूम मध्ये जाऊन यावं, तर त्या इतक्या जोशात येऊन धडा शिकवत होत्या की जसं काही सगळे विद्यार्थी म्हणजे ब्रिटीश फौजा आणि त्या झाशीची राणी ! पण काही क्षणात छातीत दुखायचं आपोआप थांबल आणि मधल्या सुट्टीची घंटा सुद्धा झाली.
गेल्या काही दिवसात आपली छाती थोडी वर आल्याच तिच्या लक्षात येऊ लागल होत. आपल्या शरीरात काही बदल होत असल्याच्या जाणीवेने ती अस्वस्थ झाली. आईजवळ बोलायला मुलींना लाज वाटत नाही, अशा गोष्टीपैकी ही एक. पण तिला मात्र बोलायची भीती वाटली. तिच्या वयाच्या मुलींमध्ये ती कधी रमलीच नाही. तिच्या मैत्रिणी होत्या वरच्या इयत्तेतल्या. त्यातही स्मिता जरा अधिकच जवळची. अंगाने थोराड असलेली स्मिता तिला मोठ्या भावासारखी वाटायची. जेव्हा वर्गातल्या मुली तिला काही कारणाने चिडवत, तेव्हा स्मिताच तिला जवळ घेई आणि डोळे वटारून, हात उगारून त्या मुलींना घाबरवून सोडे. स्मिताचा स्पर्श तिला हवा - हवासा वाटे. तिच्या अंगाला येत असलेला पावडरमिश्रित वास तर तिला खूपच आवडे. मधल्या सुट्टीत त्या दोघी भेटतच असत पण काही दिवसापासून शाळेतही एकत्र येऊ लागल्या होत्या. ' आपण दोघींनी लग्न करायचं ' असं त्यांनी खाजगीत ठरवूनही टाकल होत. एक दिवस घरी न सांगता दोघी शाळेत जाण्यासाठी निघाल्या पण शाळेत न जाता परस्पर बाहेरच भेटल्या आणि मुंबईभर भटकत राहिल्या. खिशात थोडेच पैसे असत दोघींच्या पण संपूर्ण एक दिवस एकमेकींच्या सहवासात घालवायला मिळतोय म्हटल्यावर काय करायचे होते पैसे ? एकमेकींचा हात धरून, अगदी नवीन लग्न झाल्यासारख्या एकमेकाला बिलगून चालत होत्या दोघी; जगाची पर्वा नसल्यासारख्या. नशीब कुणी ओळखीच भेटलं नाही. कारण घरी कळायला कितीसा वेळ लागणार ? दुसऱ्या दिवशी शाळेत बाईंनी विचारल, पण काहीतरी कारण सांगून त्यांनी वेळ मारून नेली. अभ्यासात दोघींची बरी प्रगती होती त्यामुळे त्यांनीही खोलात जाऊन चौकशी केली नाही.
------------------------
" माझ्या बाबांची बदली झाल्ये, पुण्याला... लवकरच निघायचय आम्हांला " एक दिवस स्मिताने सांगितल.
" म्हणजे तू मला सोडून जाणार ? कायमची... ? " भीतीने अनन्याची छाती धडधडू लागली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
" आहा रे वेडाबाई ! त्यात रडण्यासारखं काय आहे ? पुणं थोडंच लांब आहे इथून ? तुला भेटायला येईनच की मी, कधीतरी ... " स्मिताने तिला जवळ घेत म्हटल.
" मी पण येऊ का तुझ्या बरोबर ? " तिने भीत - भीत विचारल.
" तुला कसं सोडतील तुझ्या घरचे ? शिवाय इतर मैत्रिणी आहेतच की तुला ... स्मिताने समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काही समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. लाल झालेले गाल, त्यावरून ओघळणारे अश्रू ... आणि छातीतली धडधड तर एखाद्या वेगात जाणर्या आगगाडीसारखी... आता हिला कसं समजवावं असा प्रश्न स्मिताला पडला.
" मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही " इतक बोलून अनन्या पुन्हा हमसून हमसून रडायला लागली.
" पण मला जावंच लागेल " निग्रहाने म्हणत स्मिताने तिचे अश्रू पुसले. अनन्या स्मिताला बिलगली. एक नाजूक बंध घट्ट व्हायच्या आतच तुटून पडला.
-----------------------------------------------------
आज शुक्रवार... ' फतू ' आपल्या ' नेट डायरी ' मध्ये ब्लॉग लिहित होती...
मित्रानो, आज मी तुम्हाला एका गंभीर विषयाबद्दल काही सांगणार आहे. त्यातील काही मी स्वतः अनुभवल्या आहेत तर काही ऐकीव आहेत. आपल्या नेट कम्युनिटीमध्ये जसे चांगले लोक आहेत तसे काही तितकेसे चांगले नाहीत हे तुम्ही जाणताच. नेटवर संचार करताना जरा संभाळून वावरा. खुपसे झोन्स आपापले गुप्त हेतू साध्य करण्याकरीता कोणत्याही थराला जाऊ शकतात. कुणाला बिझनेस नेटवर्कचा डेटाबेस बनवायचा असतो, तर कुणाला आपली वेबसाईट प्रोमोट करायची असते. हे तसं नुकसानकारक नाही पण ह्या व्यतिरिक्त अनेक जणांचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो. आणि तो म्हणजे फसवणूक करणे. विशेषतः सेक्स सम्बन्धी. अशा लोकांचे खायचे दात एक असतात आणि दाखवायचे वेगळे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. तेव्हा सावध रहा. काळजी घ्या.
' सेव्हीयू ' ने तो ब्लॉग वाचला आणि त्याच्या डोक्यात तिडिक गेली. ' च्यायला हिने काय सोशल नेट्वर्किंगला सिरीअसली घेतलय की काय ? आणि ही कोण लागून गेली दुसऱ्याना सावध करणारी ! म्हणे सावध रहा. हुं ! ' त्याला एखादी खरमरीत कॉमेंट करायची सुरसुरी आली पण त्याने स्वतःला शांत केल. ' नकोच काही बोलायला. उगीच सगळे पाईलअप व्हायचे आपल्यावर '. असा विचार त्याच्या मनात आला. मात्र थोड्याच वेळात ' फतू ' च्या ब्लॉगवर आलेले रिप्लाइज वाचून त्याची बऱ्यापैकी करमणूक झाली. ते वाचून ' एका झोनने लिहील होत की ' इथे असे काही जण असतील हे मला माहीतच नव्हत. खरच, तुझा ब्लॉग वाचून माझे डोळे उघडले. ह्या पुढे मी सावध राहीन '. तर एकाने चक्क ' तू " डूज अन्ड डोन्टस ऑन द नेट " अस एखाद पुस्तक का छापत नाहीस ? ' अशी विचारणा केली होती. ' कर्म माझ ! ' ' म्हणजे आता ही पुस्तक छापणार की काय ? ' सेव्हीयू ' च्या तोंडून शब्द उमटले. जरी ' फतू ' त्याच्या फ्रेंड्सपैकी एक असली तरी अगदी रोजच्या रोज त्यांच्यामध्ये संवाद होत नसे. खर तर त्याच लक्ष वेधून घेईल असं त्या झोनमध्ये काही नव्हतच. निदान त्याला तसं वाटल. पण काही दिवसात हे चित्र बदलणार होत, हे त्याला तरी काय माहित...
-----------------------------------------------
राघव दिवस - रात्र इतका अभ्यास करत असे, की त्याचे मित्र त्याला ' जागव ' अशीच हाक मारत ! त्यांच्या बरोबर खेळण तर दूरच, त्यांच्याशी पाच मिनिट बोलायलासुद्धा त्याच्याकडे वेळ नसे. पुन्हा इतका अभ्यास करून वर्गातच काय पण तुकडीत सुद्धा तो पहिला - दुसरा येई असं नाही. मग हा इतका अभ्यास का करतो असा प्रश्न त्यांना पडे आणि अभ्यास करूनदेखील आपल्या काहीच कस लक्षात रहात नाही हा प्रश्न राघवला. लहानपणापासूनच त्याला कविता करण्याची आवड होती. सुरुवातीला त्याच्या आईने ' हुं , छान लिहिलयस ' असं म्हणून त्याला प्रोत्साहन दिल पण जसं - जसं त्याच अभ्यासातल लक्ष उडायला लागल, तशी ती त्याच्यावर चिडू लागली. आणि एक दिवस तिने त्याच्या नकळत त्याची कवितांची वही चक्क फेकून दिली. त्याला हे कळल्यावर खाली जाऊन त्याने ती शोधून आणली खरी, पण आईच्या धाकामुळे नंतर तो कवितेकडे फारसा वळलाच नाही. तसे त्याचे लाड ही होत असत, नाही असं नाही पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र त्याची गय होत नसे. आश्चऱ्याची गोष्ट म्हणजे तो एकुलता एक मुलगा होता. अगदी लहान असताना त्याला एक वर्ग मैत्रीण होती, जी सारखी त्याच्या शर्टाच्या बटणाशी चाळा करीत असे आणि तो तिला मागे ढकलत असे. असच एकदा रागाने त्याने तिला इतक्या जोरात ढकलल, की ती जमिनीवर उलटी पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. एक मात्र झालं. तिने त्याची एव्हढी धास्ती घेतली, की पुन्हा त्याच्या जवळसुद्धा आली नाही. मुलींशी त्याचा इतकाच काय तो सम्बन्ध आला. कारण पुढे मोठा झाल्यावरदेखील तो अधिकाधिक वेळ मुलाबरोबरच असे. त्याच्या वयाच्या मुलाना मैत्रिणी होत्या पण ह्याला मात्र एकही नाही. दिसायला तो खर तर गोड होता, तरीही. अर्थात त्याच्या आईच त्याच्यावर अगदी घारीसारख लक्ष असे. तो कुठे जातो, त्याचे मित्र कोण इत्यादी गोष्टी तिला इथ्म्भूत माहित होत्या. आपले मित्र बरे आणि आपण बरे असं राघवला वाटे. पण त्याच्या नकळत तो मुलींकडे कमी आणि मुलांकडे अधिक आकर्षित होऊ लागला होता, हे ना त्याच्या लक्षात आल ना त्याच्या आईच्या...
------------------------------------------
आजचा दिवस तसा सुस्त होता. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती, शिवाय आफिसमध्ये कामही जवळपास नव्हतच. आज मस्तपैकी ब्रौजिंग करायच असा विचार करून ' सेविव्ही ' ने ' पार्टनर्स फार यु ' ची साईट उघडली. त्याने एक नजर रिसीव्ड मेसेजेस वर फिरवली मात्र, त्याच्या भुवया ताणल्या गेल्या. ' फतू ' चा मेसेज ? आणि मला ? ' त्याचा विश्वासच बसेना. कारण आज पर्यंत तिने त्याला स्क्रपस सोडले तर काहीच लिहील नव्हत. झटकन त्याने मेसेजची लिंक दाबली आणि ' फतू ' चा, ' तू मला आवडतोस ' हा मेसेज वाचून तो अक्षरश उडाला !
' च्यायला ही काय भंकस आहे ! गम्मत करत असणार नक्कीच '. ना माझा फोटो, ना विशेष माहिती तरी ? ' पण तो सावध झाला हे मात्र नक्की. उत्तर द्याव का नाही अशात काही क्षण गेले. मग त्याने विचार केला, ' चुकून पाठवला गेला असणार हा मेसेज '. आणि त्याने उत्तर देण्याच टाळल. थोडा वेळ इकडे - तिकडे करून तो जेव्हा पुन्हा परत आला, तेव्हा मात्र तोच मेसेज पुन्हा आल्याच बघून त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. आता मात्र उत्तर द्यावच लागणार होत, पेक्षा त्याला कळून चुकल होत की हा झोन सिरिअस असणार. त्याने टाईप करायला सुरुवात केली.
प्रिय फतूस,
हे काय ! फक्त तू मला आवडतोस इतकच ? मग तूही मला आवडतेस :) आता का ते विचारू नकोस...
दोन मिनिट थांबून त्याने की बोर्डवरील एफ फाईव्हची कळ दाबली. त्याच्या अंदाजाप्रमाणे उत्तर आलेलं होत...
बर नाही विचारत, मग तर झालं ? :) फक्त तू मला आवडतोस इतकच म्हणजे ????
म्हणजे आणखी काहीच नाही ? असं...
ते कळलं रे ... बर जाऊ दे ... आपण कधी भेटायचं ???? ' फतू ' ने बॉम्ब टाकला...
मी कुणालाच भेटत नाही... सेव्हीयुने ताणल्यासारख केल.
का रे ? भीती वाटते ? घाबरतोस ? आहा रे भागू बाई... त्या उलट मी बघ, कशी बिनधास्त आहे ते... फतूच्या बोलण्यात बेफिकिरी होती.
पण भेटून काय करणार ... आणि इतके दिवस तर काहीच बोलली नाहीस, मग आजच काय झालं ? सेव्हीयूने मनातली शंका बोलून दाखवली.
छान ! म्हणजे भेटून काय करायच तेही मीच सांगू ? ठरवू, जेव्हा भेटू तेव्हा... आता इतके दिवस का नाही बोलले कारण, कारण... नाही सांगता यायचं...
कस नाही सांगता येत ? काहीतरी असणारच ना. आणि आता भेटायचं ठरवतोच आहोत तर आडपडदा कशाला ? हे बघ, एक तर आपल्या दोघांचाही फोटो नाही त्यामुळे आपण कसे दिसतो ते एकमेकाला माहित नाही. आणि मी अनोळखी माणसाना भेटत नसतो...
फोटोच काय एव्हढ घेऊन बसलायस ? फोटो तर कोणताही लावता येतो. तुला काय वाटत, किती झोन्स आपले स्वतःचे फोटो लावतात ?
नेटवर भेटलेल्याना प्रत्यक्ष भेटण, हा एक ' ट्रायल अन्ड एरर ' गेम होता ह्याबद्दल त्याची खात्री पटली होती म्हणून सेविव्हीने एक चान्स घ्यायचं ठरवल.
ठीक आहे. पण भेटायची जागा मी ठरवणार. सेविव्हीने स्पष्ट सांगितल.
दोघांच भेटायचं ठरल. 'फतू ' च्या अंगावर रोमांच फुलले, पोटात फुलपाखरानी गर्दी केली. तिला वाटल नव्हत की इतक्या सहज तो भेटायला तयार होईल. तोच काय, आत्तापर्यंत जे - जे भेटले, ते ही इतक्या लगेच भेटायला तयार नव्हते. मग हाच कसा काय तयार झाला ह्याच तिला आश्चर्य वाटल. भेटायची वेळ, ठिकाण आणि ओळख पटावी म्हणून काही खाणा - खुणा ठरल्यावर ती आपल्या इतर कामाला लागली.
-----------------------------------------------------
बाल्कनीत उभं राहून सेविव्हीने सभोवार पाहिल. सात वाजत आले होते. आजू - बाजूस गर्द झाड होती त्यामुळे हवेत गारवा होता, शिवाय नुकताच पाउस पडून गेला होता. हल्ली लवकर अंधार होत असल्यामुळे त्याने वेळही आधीची ठरवली होती. ' फतू ' बिल्डींग मध्ये येत असताना स्पष्ट दिसावी म्हणून. खालच्या बाजूस बरेचसे भाजीवाले बसले होते, शिवाय एक चणे - दाणे विकणारा. त्याच्या खोक्यातून निघणारा धूर वरपर्यंत विरळ होत येत होता. तो जळका वास त्याला असह्य झाला. तोंड कसस करत त्याने दुसरीकडे मान फिरवली. ऑफिसेस सुटलेली असल्यामुळे रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. बराच वेळ बिल्डींगमध्ये बाहेरून कुणीच आल नाही. आणि अचानक एक घार झाडाच्या ढोलीतून उडाली. फक्त एकच क्षण सेविव्हीची नजर हटली असेल तेव्हढ्यात कुणीतरी बिल्डिंगमध्ये शिरल्याचा त्याला भास झाला. रंगाचा धूसर फलकारा त्याच्या नजरेने टिपला. ' फतू ' तर नसेल ? नक्कीच असणार. झटदिशी आत येऊन तो दाराजवळील बेडवर बसला आणि कानोसा घेऊ लागला. त्याच हृदय धडधडू लागल होत, एखाद्या आगगाडी सारख...
काही क्षण शांततेत गेले. ' फतूच असेल ना ? की दुसर कुणी ? तो ब्रोकर तर नसेल कडमडला ? तो आला तर सगळ्याच प्लनची वाट लागायची '. त्याच्या मनात विचाराचा नुसता कल्ला झाला. पुढच्याच क्षणी लिफ्ट वर येतानाचा आवाज त्याने ऐकला. लिफ्ट वर येऊ लागली. थोड्याच क्षणात लिफ्टच दार उघडण्याचा आणि बंद होण्याचा आवाज आला. आणि दारावरची बेल वाजली. ' सेक्सी विदाउट व्हिआग्रा ' ने खोल श्वास घेतला आणि दार उघडल मात्र, त्याचा चेहरा पडला, ' फक्त तुझीच ' च्या, अर्थात राघवच्या चेहऱ्यावर सुद्धा आश्चऱ्याचा धक्का स्पष्ट दिसत होता. जणू काही त्या दोघांच संपूर्ण जगच थिजून गेलं होत.
' कोण हव आहे आपल्याला ? ' झटकन सावरत ' सेविव्ही ' ने, अर्थात अनन्याने विचारल.
' मला, मला ... नाही, चुकीच्या पत्त्यावर आलो बहुतेक... राघव चाचरत म्हणाला आणि जायला वळला. जाताना लिफ्ट न घेता त्याने सरळ जिना गाठला. धडपडत, जिना उतरत तो कधी बिल्डिंगच्या बाहेर आला त्याच त्यालाच कळलं नाही. त्याच सगळ अंग थरथरत होत. कसबस त्याने स्वतःला सावरल आणि रस्ता ओलांडून तो गर्दीत मिसळला.
अनन्याच्या पायाला कंप सुटला होता. घशाला कोरड पडली होती. ती मटकन खाली बसली आणि हमसून हमसून रडू लागली.
------------------------------------------------------