भाई, व्यक्ती की वल्ली

By Aditya in Reviews » Movie Reviews
Updated 17:06 IST Jan 20, 2019

काल अखेर "भाई, व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट पाहिला. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया देखील वाचल्या. खरं सांगायचे तर सध्या "टेकिंग ऑफेन्स" हा एक सामाजिक ट्रेंड बनला आहे, तेंव्हा पु ल प्रेमींनी तरी मागे का राहावे एवढाच विचार आला. एखाद्या कलाकृती बद्दल परस्परविरोधी मते ही असणारच, कुठलीच कलाकृती संपूर्ण समाजाला समाधान देऊ शकत नाही, पु लं चे लिखाण तरी सर्वांना कुठे रुचले, तेव्हा मांजरेकरांचा चित्रपट याला अपवाद नाही. मात्र, "बिईंग रिसेप्टिव टू फीडबॅक इज ए साइन ऑफ लर्निंग" असे म्हणतात, तेंव्हा आलेल्या अभिप्रायाची नोंद घ्यावी एवढीच अपेक्षा, बाकी सध्या स्वतःच्याच कोशात (बबल) मध्ये राहणे हा देखील एक ट्रेंड आहे तेंव्हा.., असो..!

चित्रपटाविषयी थोडं:
चरित्रपट (बायोपिक) हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या सद्गुणांबद्दलच असला पाहिजे असा काही नियम नाही. तेंव्हा चित्रपटात आढळणारी भाईंची डावी बाजू मला तरी फार खटकली नाही. कुठलीच व्यक्ती परफेक्ट नसते, अगदी नाव पुरुषोत्तम असले तरी, आणि तसे जर दर्शविले तर ते एकसुरी वाटते. बाकी आपल्याकडे अंध भक्तांचा तुटवडा नाही, एखाद्याला देव केले कि ती व्यक्ती कितीही चुकीचे वागली तरी त्या वागण्याचे उदात्तीकरण करणे हा त्यांचा सहज स्वभाव बनतो, तेंव्हा...

चित्रपटाला कथा स्वरूप असे नाही, केवळ ठराविक घटनांची आगगाडी आपल्या समोरून धावते, एका मागे एक घटनांचे डबे तेवढे दिसतात. ह्या डब्यात अनेक पात्रे आढळतात परंतु त्यांचा भाईंवर नेमका काय परिणाम झाला हे उमगत नाही. "किस्सा" म्हणून एखादा क्षण रंजक वाटतो मात्र संपूर्ण चित्रपट छाप सोडत नाही. सर्व कलाकारांचे प्रयन्त मात्र प्रामाणिक आहेत. पु लं च्या साहित्यात आढळणाऱ्या काही व्यक्तिरेखा आणि परिचयातील दिग्गज लोक हजेरी लावतात, मात्र संदर्भ नसल्याने ती कोण आहेत, का आहेत, आणि त्यांचे ते वागणे तसे का, हे उमगत नाही...

अगदी प्रांजळपणे बोलायचं तर ह्या भानगडीत पडणं तसे धोक्याचेच आहे, दीड दोन तासात पु लं चा संपूर्ण परिचय करून देणे अशक्य आहे. त्यांना जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा लागेल, किमान त्यांचे कथा कथन ऐकावे लागेल आणि जमलं तर "आहे मनोहर तरी" हे सुनीताबाईंचे पुस्तक वाचावे लागेल. तेवढा वेळ, उत्साह अथवा रस नसेल तर मात्र कठीण आहे.

प्रतिक्रियांबद्दल थोडे:
मला एक सोपा प्रश्न विचारावासा वाटतो, "आपल्या मनातील पु लं ची प्रतिमा आणि प्रतिभा हि त्यांच्या सिगारेट ओढण्याने अथवा मद्यपान करण्याने डळमळते का हो?" तोच सवाल वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांच्या बाबतीत. तसे असेल तर आपले विचार किती खुजे आहेत हे समजते, या महान कलाकारांची उंची तिळमात्र सुद्धा कमी होत नाही. विनाकारण प्रक्षोभक दर्शविणे जितके चुकीचे तितकेच त्यावर प्रतिक्रिया देणे हे देखील चुकीचे नाही का? जेवढे चांगले आहे तेवढे घ्या, जे नाही पटले ते सोडून द्या... ज्या माणसाने जन्मभर आपल्याला हसविले, आनंद दिला त्यांचा चरित्रपट बघून चिडता कसले..?

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.